मुंबई : रेल्वे हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपासकामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सीसीटीव्हींचे जाळे पश्विम रेल्वे मार्गावर विस्तारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी २,४४८ सीसीटीव्ही बसविले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे आरपीएफकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेचा मुंबई विभाग चर्चगेट ते डहाणू, वापीपर्यंत असून, यातील स्थानकांवर सध्या १ हजार १०३ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात १,१०३ सीसीटीव्ही असून, रेल्वे स्थानक परिसरात चोरी, खून, विनयभंग, लहान मुलांचे अपहरण इत्यादी गुन्हे घडतात. अशा वेळी सीसीटीव्हींची मदत उपयुक्त ठरत आहे. काही प्रकरणांमध्ये तर सीसीटीव्हीमुळेच गुन्हेगाराला पकडणे शक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्हीचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वेतर्फे आणखी १,७१२ कॅमेरे बसवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी दिली. यासाठी निधीची तरतूद केली जात असून, त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाकडून निर्णय घेतला जाईल. या सीसीटीव्हींबरोबरच एकात्मिक सुरक्षा प्रणालीअंतर्गत (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सीस्टम) ४३६ कॅमेऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे, तर केंद्राच्या निर्भया निधीतूनही ३०० कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. साधारपणे येत्या दोन वर्षांच्या आत एकूण २,४४८ नवीन सीसीटीव्ही बसवण्यात येतील. त्यामुळे सीसीटीव्हींची संख्या ही ३,५५१ पर्यंत जाईल. (प्रतिनिधी)>मुंबई विभागासाठी तरतूदपश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागासाठी ही तरतूद केली असून काही कॅमेरे रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांजवळ, तिकीट खिडक्यांजवळ बसवले जातील. त्यामुळे अनधिकृत फेरीवाले, तिकीट दलालांवरही कारवाई करणे आणखी सोपे होईल. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून आणखी पाच बॅगेज स्कॅनर मशिन घेण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रलसह वांद्रे टर्मिनस येथे मशिन बसवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी २,४०० कॅमेरे
By admin | Published: April 04, 2017 6:08 AM