मुंबई : महापालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणातील लेखा परीक्षण कंपनीच्या दहा जणांना अटक करण्यात आली. त्या पाठोपाठ रस्ता दुरुस्तीचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या ४ सुपरवायझर्सनाही अटक करण्यात आली आहे. संजय दिनानाथ सिंग (जे.कुमार-के. आर. कन्स्ट्रक्शन), सुनील चव्हाण (रेल्कॉन-आर. के. मधानी), संदीप जाधव (आरपीएस-के. आर. कन्स्ट्रक्शन), संथनवेल वेलमणी (आर. के. मधानी अँड कंपनी) अशी अटक सुपरवायझर्सची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ३१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या कंत्राट कंपन्यांनी महापालिकेस आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन) आणि मोघम बिले सादर केली होती. ही सर्व कागदपत्रे आणि बिले एसजीएस इंडिया प्रा.लि. आणि इंडियन रजिस्टर आॅप शिपिंग या दोन कंपन्यांच्या लेखा परीक्षकांनी प्रमाणित करून सादर केली होती. मात्र, प्रत्यक्षात रस्ते बांधणी आणि दुरुस्ती झालीच नाही. यातच तब्बल ३५२ कोटींचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी मागील आठवड्यात १० लेखा परीक्षकांना अटक केली होती. परिमंडळ १ चे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्तेबांधणीसाठी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे काम सुरू आहे की नाही, हे पाहण्याची मुख्य जबाबदारी या चौघांची असताना त्यांनी ती पार पाडली नसल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. (प्रतिनिधी)
रस्ते घोटाळ्यात आणखी ४ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 5:13 AM