ठाणे : अहमदाबाद पोलिसांनी इफेड्रिनच्या साठ्याप्रकरणी अटक केलेल्या नरेंद्र काचाला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्याचा ताबा अहमदाबाद न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. नरेंद्रच्या चौकशीतून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांनी १४ एप्रिलला सोलापूरच्या ‘एव्हॉन लाइफ सायन्सेस लि.’ या कंपनीतून धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या दोघांना अटक करून कोट्यवधी रुपयांचे हजारो टन इफेड्रिन जप्त केले. त्याच वेळी गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकानेही अहमदाबादमधून नरेंद्र काचा याला त्याच दिवशी अटक केली होती. त्याच्याकडून १,३५० किलो इफेड्रिनही हस्तगत केले होते. तो साबरमती मध्यवर्ती कारागृहात होता.दरम्यानच्या काळात ठाणे पोलिसांनी पुनीत श्रींगी, एव्हॉनचा संचालक मनोज जैन आणि हरदीप गिल यांना अटक करून आणखी इफेड्रिन हस्तगत केले. याच तिघांच्या चौकशीत जयमुखी, किशोर राठोड, विकी गोस्वामी आणि नरेंद्र काचा यांची नावेही उघड झाली. यापैकी जैन, राठोड आणि जयमुखी हे गोस्वामीला केनियात भेटल्याची माहिती चौकशीत उघड झाली.
इफेड्रीन प्रकरणी गुजरातमधून आणखी एक अटकेत
By admin | Published: May 09, 2016 3:33 AM