‘विंटर शेड्युल’मध्ये समावेश : प्रवाशांना उपलब्ध होत आहेत पर्यायनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून आॅक्टोबर महिन्यात मुंबईसाठी एक नवी विमानसेवा सुरू होणार आहे. सध्या नागपुरातून सर्वात जास्त विमानसेवा देणाऱ्या एअरलाईन्सकडून ही सेवा देण्यात येणार आहे. डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशनच्या संचालकांना या विमानसेवेसाठी पाठविलेल्या प्रस्तावात या नव्या विमानसेवेचा उल्लेख आहे. नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत थंडीच्या दिवसात वाढ होत असल्याचा अंदाज घेऊन विमान कंपनीने ही विमानसेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही विमानसेवा रात्री १० वाजता मुंबईवरून रवाना होऊन नागपुरात रात्री ११ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर सकाळी ४.३० पर्यंत या विमानाची विमानतळावर पार्किंग करून पहाटे ४.३० वाजता ते मुंबईला रवाना होईल. मुंबईमध्ये विविध कार्यालय, व्यापाराशी संबंधित बैठक आणि इतर कार्यक्रमांना वेळेवर पोहोचण्यासाठी ही विमानसेवा योग्य असल्याचे बोलल्या जात आहे. सध्या नागपुरातून मुंबईसाठी सात विमाने असून यात एकाची भर पडणार आहे. मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) मिळालेल्या प्रस्तावाच्या प्रतिलिपीत ‘विंटर शेड्युल’मध्ये बंगळुरुसाठी एक नवी सेवा सुरू होणार असल्याचा उल्लेख आहे. देशात ‘लो कॉस्ट कॅरीअर फ्लाईट’च्या रूपाने नुकतीच सुरू झालेली विमान कंपनी या विमानसेवेचे संचालन करणार असून ही विमानसेवा सायंकाळी राहणार आहे. (प्रतिनिधी) वाढत आहेत पर्यायउपराजधानीत नव्या विमानसेवा आणि इतर विमान कंपन्या आल्यामुळे प्रवाशांना अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. रेल्वेच्या एसी कोचसारखा किंवा त्यापासून कमी प्रवासभाडे असल्यामुळे प्रवासी विमानाने प्रवास करण्याला पसंती देत आहेत. १४ तास किंवा २४ तासांचा प्रवास एक ते दीड तासात होत असल्यामुळेही प्रवाशांना ते फायदेशीर ठरत आहे, असे मिहान इंडिया लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक आबीद रुही यांनी सांगितले.
मुंबईसाठी आणखी एक विमानसेवा
By admin | Published: August 10, 2014 1:32 AM