मनीषा म्हात्रे,
मुंबई- विद्यापीठ पेपर घोटाळाप्रकरणात अटक टाळण्यासाठी बडतर्फ पोलिसाने एका साथीदाराच्या मदतीने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून खंडणी उकळल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून बडतर्फ पोलिसासह एक इस्टेट एजंट आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. उत्तरपत्रिका रॅकेट भांडुप पोलिसांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याचाच गैरफायदा घेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बडतर्फ पोलीस हवालदार प्रफुल्ल बाळकृष्ण भिंगार देवे (३८), इस्टेट एजंट मिलेश आत्माराम साटम (३८) आणि निलोफर सोलकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. ऐरोली येथील रहिवासी सागर शिंदे हा अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी आहे. तोही एजंट असून त्याला या प्रकरणात धमकावल्यास अधिक पैसे मिळतील, अशी माहिती या त्रिकूटाला मिळाली. ४ जूनला रात्री ८च्या सुमारास पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भांडुप पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी आल्याची माहिती या त्रिकूटाने सागरला दिली. भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांनी आपल्याला पाठविल्याचे भासवून सागरची तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. सुटकेसाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ८० हजार दिल्यानंतर दीड लाख रुपयांवर मांडवली करण्यास त्रिकूटाने होकार दिला.अखेर सागरने मित्रांच्या मदतीने भांडुप पोलिसात तक्रार केली. सोमवारी मध्यरात्री नाहूर स्थानकात हे त्रिकूट पैसे घेण्यासाठी आले असताना भोसलेंच्या तपास पथकाने त्यांना जेरबंद केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला.तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी... वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश कानडे, उपनिरीक्षक भोसले, अमित देवकर, राहुल सावंत आणि पोलीस हवालदार अनिल साठम, सुभाष घोसाळकर, मारुती राठोड, गणेश जाधव, रमेश यादव, संतोष पाटील, राम पाटील, दीपक परदेसी, सुनील वऱ्हाडे यांनी सापळा रचला. भोसले यांच्या टीमनेच हा पेपर घोटाळा उघडकीस आणला होता.माहिती देणाऱ्या मित्राचा शोध सुरू : सागरला धडा शिकविण्यासाठी त्याच्या मित्रानेच त्याची माहिती या त्रिकूटाला दिली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे माहिती देणाऱ्या मित्राचाही भांडुप पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणामुळे या घोटाळ्याला वेगळे वळण येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.