महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा अनेकदा भाजपवर आरोप करण्यात आला होता. परंतु आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका ट्वीटनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. वेदांता-फॉक्सकॉननं आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचा दाखला देत त्यांनी हा दाव केलाय.
हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. “भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प भारतात सुरू होत असल्याचा आनंद आहे. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं धक्का बसला आहे. यापूर्वी फोटो ट्वीट करत हा प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा हेतू/वचनबद्धता हा प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर नेण्याची होती हे दिसते. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई, एमआयडीसी यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत सर्व अंतिम टप्प्यात आलं होतं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.