शिवसेनेत बंड पुकारून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. एकनाथ शिंदेंनी दिलेल्या या धक्क्यातून शिवसेना सावरत नाही तोच ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
राज्यपालांनी गेल्या दीड-दोन वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या १२ उमेदवारांची यादी विधान परिषद आमदारकीसाठी पाठविली होती. परंतू, राज्यपालांनी त्यावर आक्षेप घेत ही यादी तशीच ठेवली होती. यावरून मोठे राजकारण झाले होते. राजीनाम्याची घोषणा करताना ठाकरेंनी राज्यपालांना लोकशाहीवरून टोमणा मारताना आतातरी १२ आमदारांची यादी मंजुर करावी, असे म्हटले होते.
आता शिंदे सरकार स्वीकृत सदस्यांची नवीन यादीच पाठविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राज्य सरकार या १२ आमदारांची नवीन यादी पाठविणार आहे. जुन्या यादीत भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसेंचे नाव होते. ते बंडाचे कारण ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत निवडून आले आहेत. यामुळे खडसेंना विरोध म्हणून राज्यपाल या यादीला विरोध करत आहेत, असा दावा होता, तो देखील आता राहिला नव्हता. तरी देखील शिंदे सरकार आपली नवी यादी पाठविणार आहे.
काल फडणवीस यांनी मेट्रो कार शेड ही आरेमध्येच उभारण्यात येणार असल्याचे म्हटले होते. २५ टक्के जिथे काम झाले आहेत तिथेच मेट्रो कारशेड पूर्ण करणे मुंबईच्या हिताचे असल्याचे ते म्हणाले. यावरून ठाकरेंनी त्रास द्यायचा असेल तर मला द्या, मुंबईवर राग काढू नका, असा आरोप केला होता.