रत्नागिरी - जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेला झटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यातील आमदार उदय सामंत, योगेश कदम यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सामंत आणि कदम समर्थकांनीही उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीतील २३ पैकी २० नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आता उपजिल्हाप्रमुखपदी नेमणूक झालेले प्रकाश रसाळ यांनी काही तासांतच राजीनामा सोपवला आहे.
प्रकाश रसाळ यांनी राजीनामा पत्रात लिहिलंय की, सामना दैनिकातून जाहीर झालेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाकरिता निवडीबाबत मला आनंद आहे. परंतु माझ्या प्रकृतीमुळे आणि कौटुंबिक समस्येमुळे मला या पदाला न्याय देता येणार नाही. त्यामुळे मी हे पद स्वीकारू शकत नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे असं पत्र रसाळ यांनी रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्याकडे पाठवलं आहे.
इतकेच नाही तर रत्नागिरी युवा संघटक वैभव पाटील यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. रत्नागरी तालुक्याच्या युवा संघटकपदी नियुक्ती झाली होती. परंतु माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे या पदाचा राजीनामा देत आहे तो मंजूर करावा अशी विनंती वैभव पाटील यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना केली आहे. अलीकडेच आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बापू म्हाप, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र नव्या नियुक्तीनंतर काही तासांतच उपजिल्हाप्रमुख आणि युवा संघटक यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात
मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शहरातील शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीतील आठ लोकनियुक्त व एक स्वीकृत अशा ९ नगरसेवकांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले.