मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटातील महिला आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला. शिवसेनेतील बहुतांश आमदार शिंदेंच्या पाठिशी गेले. जवळपास ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात जात एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. त्यानंतर राज्यभरात पदाधिकारी आणि शिवसैनिकही शिंदेंसोबत जात होते. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश घेतला. सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील महिला आघाडीत प्रचंड वाद सुरू झाले. सुषमा अंधारेंना दिले जाणारे महत्त्व अनेकांना रुचले नाही. त्यातून नाराज होत अलीकडेच मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यादेखील शिंदेसोबत जाणार असल्याने विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील काही बचतगटांमधील महिला-कार्यकर्त्याही नीलम गोऱ्हेंसोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची वेळ उद्धव ठाकरे गटावर आली आहे.
कोण आहेत नीलम गोऱ्हे?
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या म्हणून नीलम गोऱ्हेंचे कार्य नेहमीच प्रभावी ठरले आहे. पक्षाची राजकीय भूमिका आजपर्यंत त्या जनतेसमोर मांडत आल्या आहेत. जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यही करतात. महिलांच्या प्रश्नी त्या कायम तत्पर असतात. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार यावर त्या काम करतात. १९९९ पासून त्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक राहिल्या आहेत. २००२ पासून आतापर्यंत तीन वेळा त्यांनी विधान परिषद आमदारकीच्या माध्यमातून काम केले आहे.