ठाणे - खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरविरूद्ध मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गोराई येथील एका जागेच्या वादातून त्याने तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह चौघांना खंडणी विरोधी पथकाने गत महिन्यात अटक केली. त्यापैकी एक आरोपी पोलीस कोठडीत, तर कासकरसह उर्वरित तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. कासकरविरुद्ध मंगळवारी खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिसरे प्रकरण गोराई येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मुंबईतील एका बिल्डरची गोराई येथे 38 एकर जमीन होती. या जमिनीच्या विक्रीचा सौदा त्याने एका व्यावसायिकाशी केला होता. त्यासाठी व्यावसायिकाकडून 2 कोटी रुपये अग्रिम रक्कम बिल्डरने घेतली. जमीन विक्रीचा पूर्ण व्यवहार होण्यास जवळपास 2 वर्षे लागली. दरम्यानच्या काळात जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे हपापलेल्या बिल्डरने जमिन हवी असेल तर दुप्पट किमत मोजावी लागेल असे व्यावसायिकास सांगितले. जमिनीचे भाव वाढले असले तरी सौदा आधीच निश्चित केला असल्याने व्यावसायिकाने वाद घातला. जमिनीच्या या व्यवहारातून व्यावसायिकाला बाजूला करण्यासाठी बिल्डरने एका एजंटशी संपर्क साधला. या एजंटच्या माध्यमातून इक्बाल कासकरचा या वादात प्रवेश झाला. व्यावसायिकास या व्यवहारातून बाजूला करण्यासाठी त्याच्याकडून घेतलेले 2 कोटी आणि स्वत:जवळचे 1 कोटी अशी एकूण 3 कोटी रुपयांची खंडणी कासकरने बिल्डरकडून उकळली. हे प्रकरण 2015-16 चे असून, जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणोनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांविरुद् मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
इक्बाल कासकरविरूद्ध खंडणीचा आणखी एक गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 9:45 PM