पुणे – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या धोक्यानंतर आता झिका व्हायरसचं संकट उभं राहिलं आहे. पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा(Zika Virus) पहिला रुग्ण आढळल्यानं स्थानिक प्रशासन अलर्ट झालं आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ७९ गावात झिका व्हायरसचा प्रार्दुभाव झाला असल्याची शंका व्यक्त केल्यानं खळबळ माजली आहे. आरोग्य विभागाने या गावात आपत्कालीन सुविधांसाठी तयारी केली आहे.
पुण्याच्या बेलसर गावात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झालं. पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाला अलर्ट करण्यात आलं आहे. ही सर्व गावं झिका व्हायरसच्या संक्रमणाच्या दृष्टीकोनातून अतिसंवेदनशील आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या गावांची यादीही तयार केली आहे. झिका, डेंग्यू आणि चिकनगुनियासारखा आजार आहे. राजेश देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील अशी गावं जे मागील ३ वर्षापासून वारंवार डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारानं प्रभावित आहेत. ती गावं झिका व्हायरसच्या संक्रमणासाठी अंतिसंवेदनशील आहेत.
आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन सतर्क
जर पुणे जिल्ह्यातील ७९ गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियासारखा आजार आढळला तर झिका व्हायरसच्या दृष्टीने ते संवेदनशील मानलं जाईल. या ७९ गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा रुग्ण आढळला तर त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. त्या रुग्णांचे झिका संक्रमणाची चाचणी होईल. ग्रामीण स्तरावर जिल्हा प्रशासनाने तहसिलदार आणि आरोग्य विभागाला तात्काळ उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
झिका व्हायरस कसा पसरतो?
झिका व्हायरस हा एडीज मच्छरांमुळे पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवतात. या मच्छरांची संख्या महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या प्रमाणात आहे. हे मच्छर झिका व्हायरसचं संक्रमण करण्यासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे झिका संक्रमणापासून वाचण्यासाठी उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग संयुक्तरित्या झिकाचं संक्रमण रोखण्यासाठी काम करणार आहेत.
काय आहेत प्रशासनाच्या सूचना?
जर कोणत्याही व्यक्तीमध्ये डेंग्यू, चिकनगुनियासारखे लक्षण आढळले तर तात्काळ त्याची तपासणी केली जाईल. ज्या जागांवर एडीज मच्छरांची उत्पत्ती होईल अशाठिकाणी स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची सूचना आहे. त्याचसोबत जलाशयाच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात यावेत जेणेकरून मच्छरांवर नियंत्रण आणण्यात येईल.
पुण्यात आढळला पहिला रुग्ण
पुण्यातील बेलसरमध्ये गेल्या महिन्याभरात तापाचे रुग्ण आढळून येत होते. तेथील ४१ जणांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बेलसर एका ५० वर्षाच्या महिलेस झिका विषाणूची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलै रोजी प्रयोगशाळेने दिला होता.