सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मला खूप मदत केली, मात्र स्वकियांनी मला म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने आणि मदत न केल्याने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आपण वेगळा निर्णय घेतला असल्याचे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश करीत आहेत़ भाजप प्रवेशासाठी आज ते सोलापुरात दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे़ यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नेहमीच मला मदत केली. माझा कोणावरही राग नाही. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदारही झालो. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांची कामे व्हावी म्हणून मला वेगळा निर्णय घ्यावा लागत असल्याचेही धनंजय महाडिक यांनी सांगितले.