मुंबई : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एसी डबल डेकर चालवून ती सायडींगला ठेवल्यानंतर आता आणखी एक एसी डबल डेकर आणण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागात धावत असलेल्या एका एसी डबल डेकर ट्रेनला प्रतिसाद मिळत नसल्याने ही ट्रेन आता मध्य रेल्वे मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसी डबल डेकर ट्रेन मोठ्या थाटामाटात सुरु करण्यात आली. एलटीटी ते मडगाव मार्गावर सुरु करण्यात आलेली ट्रेन ही ऐन गणेशोत्सवात प्रीमियम म्हणून धावली. वाढत्या मागणीनुसार या ट्रेनचे भाडे अव्वाच्यासवा वाढत असल्याने कोकणवासीयांनी त्याकडे पाठ फिरवली. गणेशोत्सवात मिळालेला प्रतिसाद पाहता ही ट्रेन दिवाळीत नॉन प्रीमियम म्हणून चालवण्यात आली. मात्र कोकणात जाण्यासाठी हा काळ गर्दीचा नसल्याने दिवाळीतही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव आणि दिवाळीत धावल्यानंतर ही ट्रेन काही महिने मुंबईतच सायडिंगला ठेवण्यात आली. आता नऊ डब्यांची असलेल्या या ट्रेनचे दोन डबे हे अन्य विभागात पाठवण्यात आले असून, उर्वरित सातपैकी एका डब्याची दुरवस्था झाल्याने तो बाजूला ठेवण्यात आला आहे, तर अन्य सहा डबे हे लोअर परेल वर्कशॉपमध्ये असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या डब्यांची देखभाल-दुरुस्ती कधी पूर्ण होईल हे सांगता येणे कठीण आहे. तसेच हे डबे जरी बाहेर आले तरी सहा डब्यात ट्रेन चालवणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वेकडून आणखी एक एसी डबल डेकरचा पर्याय समोर ठेवला आहे.या एसी डबल डेकर ट्रेनसारखीच आणखी एक एसी डबल डेकर असावी यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. या संदर्भात मध्य रेल्वेकडून रेल्वे मंत्रालयाला नुकताच प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. बारा डब्यांची असलेली ही ट्रेन आल्यास ती नॉन प्रीमियम म्हणूनच चालवण्यात येईल, असे सांगण्यात आले. ये रे माझ्या मागल्या...मागील वर्षीच्या गणेशोत्सवात चालवण्यात आलेली एसी डबल डेकर ट्रेनही भोपाळ-इंदौर रेल्वे विभागातून आणण्यात आली होती. या भागात एसी डबल डेकरला प्रतिसाद मिळत नसल्यानेच ती मुंबईत आणण्यात आली. आता पुन्हा एकदा दक्षिण मध्य रेल्वे विभागात वापरात असलेली आणि प्रतिसाद मिळत नसलेली ट्रेन मुंबईत आणली जाणार आहे.
कोकण रेल्वेवर आणखी एक डबल डेकर
By admin | Published: July 18, 2015 1:22 AM