शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला? जिल्हा बँकेसाठी कायपण....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:09 PM2023-07-07T13:09:39+5:302023-07-07T13:14:07+5:30
अजित पवारांच्या शपथविधीला जे आमदार, खासदार गेले होते त्यांच्यापैकी काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आहेत. तर शरद पवारांसोबत राहिलेले काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुकारलेले बंड आता निवडणूक आयोगात पोहोचले आहे. आता ते कधी सर्वोच्च न्यायालयात जाते हे काही सांगता येत नाहीय. अजित पवारांनीशरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या शपथविधीला जे आमदार, खासदार गेले होते त्यांच्यापैकी काही आमदार, खासदार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आहेत. तर शरद पवारांसोबत राहिलेले काही जण अजित पवारांच्या संपर्कात आहेत. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात शरद पवारांच्या गटातील आणखी एक आमदार अजित पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अजित पवार हे 3 वर्षात 3 वेळा उपमुख्यमंत्री बनले आहेत. संख्याबळाबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सामना रंगलाय. मात्र अजित पवार यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे. दोन्ही गटांत एकमेकांना काढून टाकण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर दावा करताना अजित पवार यांनी शरद पवारांच्याच अध्यक्षपदावरील निवड बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तर शरद पवारांनी अजित पवारांसह नऊ मंत्री, तटकरे, पटेल यांना काढून टाकले आहे. आता ही लढाई आणखी पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले माजी मंत्री बुलढाण्याचे सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे देखील आता अजित पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या वडिलांनी, आईंनी आणि त्यांनी सुद्धा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असलेली जिल्हा सहकारी बँकचे कामकाज पाहिले आहे. या काळात ही जिल्हा सहकारी बँक अडचणीत आली होती. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हते. मात्र मध्यंतरी विरोधीपक्षामध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब यांनी या बँकेला मदत केली होती. सध्याही जिल्हा सहकारी बँकेची नाजूक परिस्थितीबाबतची ही गोष्ट अजितदादांना माहित होती.
अजित पवारांनी मला बोलवून सांगितलं की, तुम्ही माझ्या सोबत काम करण्याची भूमिका घेतली तर मी याच्यामध्ये पुढाकार घेऊन तुम्हाला मदत करू शकतो. त्यांनी तशी भुमिका माझ्यासमोर मांडली, त्यामुळे मी सुद्धा अलिकळडच्या काळामध्ये काल परवापासून अजितदादांच्या बरोबर आपण राहायला पाहिजे, बँक सुधारली पाहिजे, बँक पुढं गेली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काही जरी त्याग करावा लागला तरी ती करण्याची माझी तयारी आहे, या भूमिकेतून अजित दादांसोबत जाण्याचा माझा विचार करत आहे, असा असा खुलासा शिंगणे यांनी केला आहे. यामुळे शिंगणे अजित पवार गटासोबत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.