मुंबई – मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे. राज ठाकरे यांनी अनाधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता ४ मे रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. मात्र मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. जवळपास १५ हजार कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवल्या.
मनसेनं हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर ४ मे रोजी जवळपास १ हजार मशिदींनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत भोंग्यावरून अजान म्हंटली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांनी या मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवली नाही. मात्र एकूण ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींनी भोंग्यावरून अजान म्हटली. त्यामुळे आता या मशिदीवर काय कारवाई करणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारत जोपर्यंत भोंगे उतरत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. हे केवळ एक दिवसांचे आंदोलन नाही असं स्पष्ट केले आहे.
आता मनसेनं या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गुगल फॉर्मद्वारे जनतेची डिजिटल स्वाक्षरी मोहिम सुरु केली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फॉर्म जारी करण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये मनसेने लोकांना काही प्रश्न विचारले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवले पाहिजेत या मागणीला समर्थन आहे का?, भोंगे या विषयावर तुमचे मत, शहर, परिसर, गावाचे नाव, तुमचे नाव, संपर्क क्रमांक असा पूर्ण फॉर्म भरून सब्मिट करायचा आहे.
अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?
मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न काही राजकीय नसून समाजिक विषय असल्याचं आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच आजचं आंदोलन हे काही एका दिवसाचं आंदोलन नसून जोवर मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी ज्यांनी आज पहाटे भोंग्यांवरुन अजान न देता सहकार्य केलं अशा मौलवींचेही राज ठाकरे यांनी आभार मानले.
"विश्वास नांगरे पाटील यांनी फोनवरुन मुंबईतील मशिदींच्या मौलवींशी बोलणं झालं असून ते पहाटेची अजान भोंग्यांवरुन देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच दिवसभरातील अजान देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार होतील असं म्हटलं. पण आज मुंबईत मला मिळालेल्या माहितीनुसार १३५ मशिदींवर पहाटे भोंग्यांवरुन अजान झाली याविरोधात कारवाई केली जाणार आहे की नाही?", असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.