ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २१ - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात भर उन्हात पाणी भरल्याने उष्माघात होऊन ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विहिरीतून पाणी काढताना ७ वर्षीय मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.
सचिन गोपीनाथ केंगार असे त्या मुलाचे नाव असून तो केज तालुक्यातील विडा येथील रहिवासी होता. विहीरातून पाणी शेंदताना सचिन विहीरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वीच दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने योगिता देसाई या मुलीचा मृत्यू झाला होता. भर उन्हात हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या योगिताला तेथेच चक्कर आली आणि मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील साबलखेडा गावात ही घटना घडली.
डोक्यावर सुर्य तळपत असताना योगिता देसाई गावापासून 500 किमी अंतरावर असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. तिने पाच फे-या मारल्या होत्या. योगिता गेले काही दिवस आजारी होती. पण तरीही ती पाणी भरण्यासाठी गेली होती. पाचव्या फेरीला तिला चक्कर आली आणि खाली कोसळली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले, मात्र तिचा मृत्यू झाला.