Vijay Wadettiwar : मुंबई : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प यापूर्वी महाराष्ट्रातून गुजरातला गेले. आता आणखी एक महाराष्ट्रात येणारा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प नागपूरला येणार होता. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे महाराष्ट्रात येणारा आणखी एक उद्योग गुजरातकडे गेल्याची टीका काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर ट्विट करत राज्यातील महायुती सरकावर हल्लाबोल केला आहे. "महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे गेला. महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. आधी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे", असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, "हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जीभेला चटके द्या, पक्ष फोडा-आमदार पळवा, सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अधिकारी हे मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे." असा टोला विजय वडेट्टीवार लगावला आहे. तसेच, "मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत असून राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत", असा आरोपही विजय वडेट्टीवार महायुती सरकारवर केला आहे.