रवींद्र देशमुखमुंबई - राज्यात महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तारही झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालं नाही. परंतु, खाते वाटपापूर्वीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नाराजीचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यानंतर जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही महाविकास आघाडीला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भातील निर्णय आपण कार्यकर्त्यांवर सोपविल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले आहे.
मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने कैलास गोरंट्याल नाराज आहेत. ही नाराजी आता समोर आली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. जालना विधानसभा मतदार संघातून आपण तीनवेळा विजय मिळवला. अर्जुन खोतकर यांच्यासारखा प्रतिस्पर्धी असताना जालना जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवले. एवढच नाही तर जालना नगर परिषदही काँग्रेसच्या ताब्यात ठेवली. परंतु, यावेळीही पक्षाकडून डावलण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी डावलून पक्षाने आपल्यावर मर्यादा घातल्याचे सांगत गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
शिवसेना नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत आधीच महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच गोरंट्याल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीमध्ये देखील अशाच प्रकारची नाराजी उफाळून आली होती. आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र पक्षाकडून त्यांची समजूत काढण्यात आली होती. आता गोरंट्याल यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेतृत्व यशस्वी ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.