कोल्हापूर/आंबोली (सिंधुदुर्ग) : आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील स्चिस्टुरा हिरण्यकेशी या माशाची नवीन प्रजात डॉ. प्रवीणराज जयसिम्हण, शंकर बालसुब्रमण्यम, तेजस ठाकरे या संशोधकांनी संशोधनाअंती जगासमोर आणली आहे. याबाबत अॅक्वा इंटरनॅशनल जर्नल आॅफ इचिथॉलॉजी मध्ये संशोधनपर प्रबंध प्रकाशित झाला आहे.
आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैवविविधतने अतिशय संपन्न आहे. विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आली आहे. यातील काही प्रजाती तर जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्ये सापडतात; त्यामध्येच आणखी एक म्हणजे या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे.गेली काही महिने मी या विषयावर मत्स्यछायाचित्रे टिपणारे शंकर बालसुब्रह्मण्यम् आणि तरुण आणि समर्पित मत्स्यवैज्ञानिक डॉ. प्रवीणराज जयसिम्हण यांच्यासोबत काम करीत आहे. प्राचीन हिरण्यकश्यपू मंदिराच्या आवारात असलेल्या नैसर्गिक कुंडात हा अनोखा मासा आढळला. सुवर्णकेशसंभाराला संस्कृतमध्ये ‘हिरण्यकेशी’ म्हटले जाते. पूर्ण वाढीच्या माशामध्ये हा सुवर्णरंग दिसतो; म्हणून या माशाला या नदीचे नाव दिले आहे. - तेजस ठाकरे, संशोधक.अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही. सुवर्ण केशसंभार व हिरण्यकेशी नदीपात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे ‘स्चिस्टुरा हिरण्यकेशी’ असे नामकरण करण्यात आले आहे.