मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला प्रोड्युसर राहुल राज सिंग याचा उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. राहुलने प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा किंवा त्याचा तसा हेतू असल्याचे पुरावे रेकॉर्डवर न आणल्याने उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.‘अर्जदार आरोपी (राहुल सिंग) आणि पीडिता (प्रत्युषा बॅनर्जी ) एकमेकांची छळवूणक करत असल्याचे व दोघांमध्ये वाद असल्याचे साक्षीदारांच्या साक्षीवरून स्पष्ट होते. मात्र सकृतदर्शनी पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे दिसून येत नाही,’ असे न्या. मृदुला भाटकर यांनी म्हटले.सत्र न्यायालयाने राहुलची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला. राहुलची अटकपूर्व जामिनावर सुटका करताना न्या. भाटकर यांनी त्याला दोन आठवडे बांगूरनगर पोलीस ठाण्यात आठवड्यातून तीनदा हजेरी लावण्याचे निर्देश दिले. ‘आयपीसी ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी आरोपीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, त्याचा तसा हेतू असल्याचे सिद्ध झाले पाहिजे,’ असे न्या. भाटकर यांनी म्हटले.
राहुल राज सिंगचा अटकपूर्व जामीन मंजूर
By admin | Published: April 26, 2016 6:10 AM