ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यप वादग्रस्त ट्विट्स, बेताल वक्तव्य आणि त्याच्या असभ्य वर्तनामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याने स्वतःच्या बेताल वागण्याची पातळीच सोडली आहे, असेच म्हणावे लागेल. पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवत अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानच्या दौ-यावर प्रश्न उपस्थित करत माफीची मागणी केली होती. या वादासंदर्भात मुलाखतीसाठी विचारणा करणा-या महिला पत्रकारासोबतचे व्हॉट्स अॅप चॅट, तिचा फोन नंबर त्याने फेसबुकवर सार्वजनिक केला. यानंतर वाद निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने घाबरुन केलेले पोस्ट काढूनही टाकले. या असभ्य वर्तनामुळे त्याच्याविरोधात सर्व स्तरातून संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी, अनुरागने पंतप्रधान मोदींना पाकिस्तान दौ-याचा जाब विचारत माफीची मागणी केली होती. यावरुनही चौफेर टीका होऊ लागल्याने अनुराग वादातून पळ काढू लागला. याचसंदर्भात एका महिला पत्रकाराने अनुरागला मुलाखतीसाठी विचारले होते, आणि यावेळीही त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी पळ काढल्याचे समोर आले. या महिला पत्रकाराने पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या ट्विटच्या वादावर अनुरागची बाजू जाणून घेण्यासाठी व्हॉट्स अॅपवरुन संवाद साधला. यावर त्याने तिला मुलाखत देण्यासाठी तर नाकारलेच, मात्र तिच्यासोबत केलेले व्हॉट्स अॅप चॅट फेकबुकवर पोस्ट केले. हे पोस्ट व्हायरल करताना त्याला संबंधित महिला पत्रकाराचे नाव, फोटो आणि मोबाईल नंबर एडिटही करावासा वाटला नाही. पंतप्रधानांकडून माफीची अपेक्षा ठेवणा-या अनुराग एका महिलेची खासगी माहिती अशी उघड करु नये याची साधी कल्पनाही नसावी का ? अनुरागचे सोशल मीडियावर एक लाख फॉलोअर्स आहेत आणि या सर्वांसोबत तिची माहिती त्याने शेअर केली होती. म्हणजे एक लाख लोकांना त्या महिलेचा फोन क्रमांक मिळाला होता. आता हे न कळण्याइतपत अज्ञानी तरी अनुराग नक्कीच नसावा.
त्याच्या असभ्य वागण्यामुळे, संबंधित महिला पत्रकाराच्या मोबाईलवर बांगलादेश, पाकिस्तानसारख्या देशांमधून धमकीचे, अश्लिल, शिवीगाळ करणारे फोन आणि मेसेज येऊ लागले. नेमका काय प्रकार घडत आहे, हे काही वेळासाठी त्या महिला पत्रकाराला समजूच शकले नाही. याचदरम्यान तिच्या ओळखीच्या माणसांनी अनुराग कश्यपच्या फेसबुक अकाऊंटचे स्क्रीन शॉट तिला पाठवले. यात अनुरागने तिच्यासोबतचे व्हॉट्स अॅप चॅट नाव, फोन नंबर एडिट न करता सरळसकट सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे तिच्या लक्षात आले.
महिला पत्रकाराने हा सर्व प्रकार आपल्या संपादकांना सांगितल्यानंतऱ आता चॅनेल अनुराग कश्यपविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे.
'ए दिल है मुश्किल' सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे सिनेमा अडचणीत सापडला आहे. यावरुन अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. तसेच, पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करायला घालण्यात आलेल्या बंदीला विरोध दर्शवत अनुरागने नव्या वादाला तोंड फोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानचा केलेल्या दौ-याचा दाखला देत, त्याने पंतप्रधानांकडे माफीची मागणी केली होती. यावरुनच त्याने नव्या वादाला तोंड फोडले.