लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात आजघडीला सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी याचवेळी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे राज्यासमोरील चिंता वाढली असून काही भागात ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे राज्य सरकारनेही नियोजनास सुरुवात केली आहे. यामध्ये विशेषतः पिण्याचे पाणी तसेच गुरांसाठी चाऱ्याचे नियोजन ठेवण्याच्या सूचना कृषी आणि महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. राज्यात ११३.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे. मात्र, पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
१००% पेक्षा जास्त - ६ जिल्हे - ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नांदेड, यवतमाळ.
७५ ते १००% - १३ जिल्हे - रत्नागिरी, जळगाव, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
५० ते ७५% - १५ जिल्हे - नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती.
२५ ते ५०% - राज्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत केवळ २५ ते ५० टक्के पाऊस
पिके तरली; पण प्रतीक्षा कायम
पुणे: दीर्घ खंडानंतर तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने बहुतांश पिकांना जीवनदान मिळाले आहे. असे असले तरी धरणांच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ होणार नाही अशीच चिन्हे आहेत. अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दडीनंतर आता तडाखा
नागपूर : दाेन आठवड्यांच्या दडीनंतर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. शनिवारी रात्री पूर्व विदर्भातील वर्धा, गडचिराेली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत पावसाचा जाेरदार फटका बसला. या पावसामुळे अनेक भागांतील शेत शिवारात पाणी साचले असून पिकांची नासाडी झाली आहे. काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.