लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात शनिवारी आणखी आठ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी चार रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर तीन रुग्ण सातारा येथे आणि एक रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यात मुंबई- १८, पिंपरी चिंचवड- १०, पुणे ग्रामीण- ६, पुणे मनपा- ३ , सातारा- ३, कल्याण-डोंबिवली- २, उस्मानाबाद- २, बुलडाणा- १, नागपूर- १, लातूर- १ आणि वसई विरार- १ इ. रुग्णांचा समावेश आहे. यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात नोंद झालेल्या आठ रुग्णांमध्ये मुंबईचे ४ रुग्ण आहेत. मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे. तीन रुग्ण छत्तीसगड, केरळ आणि जळगाव येथील रहिवासी आहेत. यातील दोघांनी द. आफ्रिकेचा, एकाने टांझानियाचा, तर एकाने इंग्लंडचा प्रवास केला आहे.
सातारा येथील तीन रुग्ण
हे पूर्व आफ्रिकेचा प्रवास केलेले एकाच कुटुंबातील सदस्य असून हे सर्व जण लक्षणेविरहित आणि विलगीकरणात आहेत. यातील ८ वर्षांची मुलगी वगळता इतर दोघांचे लसीकरण झाले आहे.
पुण्यातील एक रुग्ण
पुणे येथील एक रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशाचा निकटसहवासित असून १७ वर्षांच्या या मुलीला कोणतीही लक्षणे नाहीत. ती १८ वर्षांखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.
८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित
राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५५१ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ८६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.