पुणे - मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीपूर्वी एस.टी.बसेस,पाणी,स्वछता,आरोग्य आदी नियोजनव्यवस्थेचा पंढरपूरात जाऊन आपण स्वतः आढावा घेणार असून वारकरी बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून नाही तर पांडुरंगाचा सेवक म्हणून ही सेवा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वारकऱ्यांना सांगितले.
जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशकोत्तर अमृतमहोत्सवी ३७५ वा वैकुंठगमन सोहळा सप्ताह सासवड येथे सुरू आहे. या सोहळ्याला नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू न शकलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून वारकऱ्यांना संबोधित केले. यावर्षीच्या आषाढी वारीचे नियोजन हे मागील वर्षीप्रमाणेच "निर्मल वारी,आरोग्यमय वारी" अशा स्वरुपाचे व सर्वसुविधायुक्त करणार आहोत. कोणत्याही राजसत्तेला धर्मसत्तेचा आशीर्वाद हा असावाच लागतो आणि याचसाठी तुम्हा संतमंडळींचे धार्मिक, अध्यात्मिक अधिष्ठान खूप मोलाची भूमिका निभावत असल्याचं शिंदे यांनी वारकऱ्यांना सांगितले.
तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये वारकरी संप्रदायाच्या आशिर्वादाचा, सहकार्याचा आणि समन्वयाचा महत्वपूर्ण वाटा आहे. पंढरपूर मंदिर आणि परिसर विकास आराखडा तयार करुन यासंदर्भातील कामे देखील अगदी प्रगतीपथावर आहेत. पालखी मार्गांची कामे देखील दर्जेदार झाली आहेत. चंद्रभागा घाटाचे काम देखील पूर्णत्वाचे स्वरुप धारण करत आहे. महाराष्ट्रातील अनेक धार्मिक गडांच्या, तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यासोबतच वारीमध्ये लाखो भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबीरांचे नियोजन मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात येणार आहे. अशी एक ना अनेक वारकऱ्यांशी निगडीत असणारी कामे शासन करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.
दरम्यान, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आधार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे या संप्रदायाचे पाया आहेत तर जगद्गुरु संत तुकोबाराय हे कळस ! महाराष्ट्रातील सर्वच संतमंडळींनी मानवाला जीवन जगण्यासाठी दिलेला व्यापक दृष्टीकोन अनेक मोठमोठ्या समस्येवरील उपाय ठरतो आहे. ४५०० अभंगांचे लिखाण करत समाजाला उपदेश करणाऱ्या जगद्गुरु संत तुकोबारायांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आणि यानिमित्ताने सासवड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे निमित्त साधून भरलेला वैष्णवांचा मेळा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे वैभव प्रतिबिंबीत करणारा होता असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी ह.भ.प.माऊली महाराजांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने कक्ष प्रमुख मंगेश चिवटेंच्या माध्यमातून चाललेल्या रुग्णसेवेच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला.