मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशातच भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकतं असं विधान राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी केले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, पूर्वीच्या कालखंडातील भाजपा आणि आत्ताच्या भाजपात जमीन आस्मानचा फरक आहे. पहाटेच्या वेळीस अजित पवारांना घेऊन देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर एकनाथ शिंदे ५० आमदार घेऊन बाहेर पडतील ते देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार बनवतील असं वाटलं नव्हतं. राजकारणात भविष्यात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपा-मनसे एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं खडसेंनी सांगितले आहे.
युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतीलकौटुंबिक संबंधातून राज ठाकरेंची मी भेट घेतली. राजकीय अर्थ काढू नका. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो केंद्रातील नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे घेतील. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपा कशी वाढेल हीच माझी जबाबदारी, युतीबाबत जी भूमिका असेल ते वरिष्ठ नेते घेतील असं सांगत भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सूतोवाच केले
बावनकुळेंनी राज ठाकरेंचं कौतुक करत म्हटलं की, राज ठाकरे नेहमीच हिंदुत्वाची बाजू मांडत आलेत. हिंदुत्वाचं रक्षण करत आलेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर नाही. हिंदुत्वाचं आणि महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या नेतृत्वाला भेटण्यात काही अडचण नाही. आजच्या भेटीचा संबंध केवळ कौटुंबिक, राजकीय नाही. राज ठाकरे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र, हिंदुत्वाचं रक्षण करणारे अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान नेते आहेत. फायटर आहेत असं त्यांनी म्हटलं. जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
भाजपा-मनसे युतीची चर्चाशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला जवळ केल्यानंतर राज ठाकरेंनी पक्षांचा अजेंडा आणि झेंडा बदलत हिंदुत्वाची भूमिका पुढे आणली. त्यानंतर राज ठाकरे हिंदुत्ववादी शिवसेनेची स्पेस भरून काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे दुरावलेल्या भाजपा नेत्यांनी राज ठाकरेंची जवळीक वाढवली. अलीकडेच राज्यात सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ निवासस्थानी जात राज यांची भेट घेतली. त्याचसोबत इतर भाजपा नेतेही राज ठाकरेंची भेट घेत आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार का अशीच चर्चा राज्यातील जनतेमध्ये आहे.