नाशिक : ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांना गुरुवारी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते येथील सार्वजनिक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.मुख्य प्रवाहापेक्षा वेगळ्या वाटेवरच्या पत्रकारितेने समाधान दिल्याचे वेलणकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ब्रेकिंग न्यूज, रोजच्या बातम्यांमध्ये नसणाऱ्या पुरवणी वा अन्य विभागांतील पत्रकारांकडे दुय्यमभावाने पाहिले जाते. राजकीय व अन्य महत्त्वाची बीट्स मिळत नाहीत, अशा तक्रारीही महिला पत्रकारांच्या असतात. मात्र रोजच्या बातम्यांसाठीच्या धावपळीऐवजी वेगळे लेखन करताना शांतपणे जग पाहण्याची संधी, नवे विषय, वेगळी माणसे मिळतात. अशाच रस्त्यावर चालत राहिल्याने कामातून आनंद तर मिळालाच; पण माणूस म्हणून समृद्ध होण्याची दुर्मीळ संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.सध्याच्या सोशल मीडियाच्या गदारोळात, विचित्र घटनांच्या कोलाहलात, नकारात्मकतेने भरलेल्या समाजात सकारात्मकता रुजवत राहण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याचे मत खांडेकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
अपर्णा वेलणकर यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार
By admin | Published: April 29, 2016 2:37 AM