लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून अद्यापही अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे सध्या राज्यात कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्र कोरडाच आहे. रविवारी कोकणात अनेक ठिकाणी तर राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली मात्र जोर कमी आहे.राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक भागात मागील महिनाभरापासून जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. पुढील काही दिवसही चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.रविवारी दिवसभरात राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल रत्नागिरी ७ मिमी, मालेगाव ६, अकोला ३, तर सातारा येथे २ मिमी पाऊस पडला. मुंबईत काही भागात तुरळक पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी असून अम्बोणे येथे ४०, कोयना ३० तर ताम्हिणी येथे २० मिमी पावसाची नोंद झाली.तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुढील तीन-चार दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. ७ ते १० आॅगस्टदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई पावसाची विश्रांती असली तरी तुरळक ठिकाणी सरी कोसळत आहेत.गेल्या २४ तासांत मुंबई शहरात ०.१६, पूर्व उपनगरात १.५७ आणि पश्चिम उपनगरात १.११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकण वगळता महाराष्ट्र कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 4:18 AM