जमीर काझी,
मुंबई- वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडून होणारा मानसिक त्रास आणि निलंबनाच्या कारवाईमुळे मुंबईतून स्वत:हून नक्षलग्रस्त भागात बदली करून घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस खात्याला कायमचा रामराम ठोकला आहे. आपल्या निलंबनाची चौकशी पूर्ण करून त्वरित राजीनामा मंजूर करा, असे साकडे त्याने पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना घातले आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहसचिव के. पी. बक्षी यांनाही पाठविली आहे.सहायक पोलीस निरीक्षक जगदीश काटे यांनी गोंदियातील आमगावच्या उपअधीक्षक दीपाली खन्ना यांच्या छळाला कंटाळून खात्यात काम करण्याची इच्छा नसल्याचे पत्र महासंचालकांना १७ आॅगस्ट रोजी पाठविले आहे. त्याची प्रत ‘लोकमत’च्या हाती लागली. आमगाव पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना, महिलेने परपुरुषाशी विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर दिली होती. मात्र असे असतानाही दीपाली खन्ना यांनी त्या प्रकरणात बलात्काराची केस दाखल करण्यास काटे यांनी टाळाटाळ केल्याचा पूर्वग्रहदूषित अहवाल अधीक्षकांना पाठवला आणि त्यामुळे आपले निलंबन झाल्याचा दावा काटे यांनी या निवेदनात केला आहे.>एपीआय काटे यांचे निलंबन केल्यानंतर त्यांनी दबाव आणण्यासाठी राजीनामा सादर केला आहे. प्राथमिक चौकशीत ते दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. विभागीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.- डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलीस अधीक्षक, गोंदिया>काटे यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून, आपला वैयक्तिक राग नाही. गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास हलगर्जीपणा केला, त्याचप्रमाणे त्याबाबत खुलासाही दिला नाही. माझ्याबाबत ‘आरटीआय’तून माहिती जमा करीत दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करीत आहे.- दीपाली खन्ना, उपअधीक्षक, आमगाव, गोंदिया