नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूससह इतर आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल २३ हजार पेट्यांमधून माल विक्रीसाठी आला आहे. कोकणसह तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही आंबा विक्रीसाठी येत आहे.या वर्षी मार्केटमध्ये हापूसची आवक लवकर सुरू झाली आहे. सुरुवातीला हंगाम चांगला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु थंडीचा कालावधी वाढल्यामुळे व थ्रीप्स रोगाची लागण झाल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम झाला आहे. मार्च महिना सुरू झाल्यापासून रोज ५ ते १० हजार पेट्यांची आवक होऊ लागली होती. सोमवारी पहिल्यांदा २३ हजार पेट्यांची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडमधून हापूस विक्रीसाठी येत आहे. तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेशमधूनही माल विक्रीसाठी येत आहे.बाजार समितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये ४ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विकली जात आहे. बदामी ६० ते १०० रुपये किलो, लालबाग ५० ते ७० रुपये किलो व तोतापुरी ४० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. होळीनंतर आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. एप्रिलमध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात आंबा येईल, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.हवामानाचा परिणामया वर्षी ५ नोव्हेंबरला हापूसची पहिली पेटी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आली होती. पहिल्यांदाच नोव्हेंबरमध्ये आंबा विक्रीसाठी आला होता. यामुळे व्यापाऱ्यांसह उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आंब्याला मोहोरही चांगला धरला होता, परंतु थंडीचा हंगाम वाढल्यामुळे व थ्रीप्सच्या रोगाची लागण झाल्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम झाला आहे.हापूसच्या २३ हजार पेट्यांची आवक झाली असून ४ ते ८ डझनची पेटी २ ते ५ हजार रुपये दराने विकली जात आहे. होळीनंतर आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.- संजय पानसरे, आंबा व्यापारी
एपीएमसीत २३ हजार पेट्या आंब्याची आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:29 AM