लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी रुपये वाटल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांच्या आत माध्यमांसमोर बिनशर्त माफी मागावी; अन्यथा फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा या नोटीसमध्ये दिला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
‘एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले’, असे दावे राऊत यांनी केले होते.
मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीमधील पक्षांविरोधात राऊत यांनी सातत्याने बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे, तसेच राऊत यांनी केलेला पैसे वाटपाचा आरोप बिनबुडाचा आणि धादांत खोटा असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
नोटिशीची खिल्ली
एकनाथ शिंदेंनी पाठवलेली ही नोटीस संजय राऊत यांनी एक्स या समाजमाध्यमावर टाकत खिल्ली उडवली आहे. ‘५० खोके एकदम ओके, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, गैरसंवैधानिक मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा एक मजेशीर राजकीय दस्तावेज आहे.’ अशा शब्दांत राऊत यांनी या नोटिशीची खिल्ली उडवली आहे.