ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2- आपल्या वाढदिवसाला महाराष्ट्राची फाळणी करणारा केक कापून खळबळ उडवून देणा-या विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी शेवटी या प्रकरणी माफी मागितली आहे. असे करायला नको होते. माझ्या या कृतीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल मी माफी मागत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सोमवारी रात्री ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्वत:च्या वाढदिवशी अणे यांनी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेल्या केकमधून विदर्भ कापून वेगळा केला होता. त्यांनी केलेल्या या कृतीवरून राज्यातील राजकारण तापले होते व राज ठाकरे, नीतेश राणे यांनी टीकेची झोड उठविली होती. अणे यांनी विदर्भाची मागणी करावी. तो त्यांचा मुद्दा आहे. परंतु असे करत असताना महाराष्ट्राचा केक कापून नागरिकांच्या भावना दुखाविण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटली होती. या एकूणच वादावर पडदा टाकण्यासाठी अणे यांनी हे पाऊल उचलले आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना अणे यांनी आपल्या भावना मांडल्या. संबंधित कृती ही जाणूनबुजून केली नव्हती. कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. जे काही झाले ते योग्य नव्हतेच. मुळात ते व्हायलाच नको होते. विदर्भाच्या परंपरेला ते शोभा देणारे नव्हते. केक कापल्यानंतर जे काही वाद निर्माण झाले, ते अस्वस्थ करणारे आहेत. त्यामुळेच माझ्या कृतीबद्दल मी महाराष्ट्राची माफी मागतो आहे, असे मत श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. विदर्भाचे राज्य वेगळे करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. परंतु अशाप्रकारच्या बाबी टाळण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेल, असेदेखील ते म्हणाले.