मुंबई : मराठा आरक्षणाबाबत शिवसेना मुखपत्रात प्रकाशित व्यंगचित्रावरुन मराठा समाजातील नाराजी आणि विरोधकांच्या टीकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्यानंतर दुस-या दिवशी ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सामनातील अग्रलेख ही शिवसेनेची भूमिका असते. इतर बाहेरच्या लोकांनी केलेले लिखाण, व्यंगचित्रे ही सामना किंवा शिवसेनेची भूमिका कधीच नसते. तरीही या सगळ्याची नैतिक जबाबदारी सामनाने कधीच झटकली नाही. म्हणून सामनातील व्यंगचित्रावरुन मराठा समाह व खासकरुन माता-भगिनींचा अपमान झाला असेल स्वत: दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकत असल्याचे राऊत यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आपण महाराष्ट्राबाहेर असल्याने उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोहचू शकलो नाही, पण गेल्या काही दिवसातील घटना व बदनामीकारक प्रचाराने व्यथित झालो असल्याचेही राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे. सदर व्यंगचित्र हा जाणूनबुजून झालेला प्रकार नव्हता तो निव्वळ अपघात होता. कुणाच्याही भावना दुखावल्या जाव्यात, अपमान व्हावा असा हेतू त्यामागे असून शकत नाही. एखाद्या समाजाचा व खास करुन माता-भगिनींचा अपमान करणारे वक्तव्य किंवा लिखाण आपण कधी केले नाही. म्हणून सदर व्यंगचित्रावरुन मराठा समाज व माता-भगिनींचा अपमान झाला असेल तर मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी पत्रकात म्हटले. (प्रतिनिधी)
संजय राऊत यांचाही माफीनामा
By admin | Published: October 03, 2016 5:38 AM