मुंबई : पेट्रोल पंपचालकांच्या (डीलर्स) विविध मागण्या मान्य करूनही अवास्तव मागण्यांसाठी संप केल्यास डीलर्सवर कारवाई करण्याचा इशारा इंडियन आॅइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीनही तेल कंपन्यांनी मंगळवारच्या पत्रकार परिषदेत दिला. सामान्यांना वेठीस धरण्यापेक्षा डीलर्सनी चर्चेने प्रश्न सोडवण्याचे आवाहनही इंडियन आॅइलचे वितरण विभागाचे संचालक बलविंदर सिंग कांत यांनी केले आहे.पेट्रोल व डिझेलच्या डीलर्सच्या द फेडरेशन आॅफ आॅल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स, द आॅल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, सीआयपीडी या तीन संघटनांनी एकत्रित येत १३ आॅक्टोबरला एक दिवसीय, तर २७ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. कांत यांनी सांगितले की, संघटनांसोबत मागण्यांवर सातत्याने चर्चा करत अधिकतम मागण्या पूर्ण केल्या आहेत. १३ आॅक्टोबरला एक दिवस डीलर्सने पेट्रोल व डिझेलची खरेदी-विक्री थांबवली, तरी काहीही नुकसान होणार नाही. सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून तेल कंपन्यांकडून चालवण्यात येणारे १ हजार पेट्रोल पंप बंददरम्यान सुरू राहतील. त्यानंतरही २७ आॅक्टोबरला बेमुदत बंद केल्यास शासनाकडून अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार डीलर्सवर कारवाई करण्यात येईल.एमडीजी नियमावली काय सांगते?पेट्रोल पंपावरील कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे लागणार. त्याचा परतावा पंपचालकांना तेल कंपन्यांकडून केला जाईल. पेट्रोल व डिझेल वितरण करणाºया नोझलची रोज तपासणी करावी. जेणेकरून ग्राहकांची लूट होणार नाही.घरपोच पेट्रोल विचाराधीन-बदलत्या काळानुसार ग्राहकांना पेट्रोलियम पदार्थ घरपोच देण्याची संकल्पना विचाराधीन असल्याचे कांत यांनी सांगितले. ग्राहकांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव पेट्रोलियम एक्स्प्लोजिव्ह सेफ्टी आॅर्गनायझेशन (पेसो) कडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे.
पेट्रोल पंपचालकांनी संप केल्यास कारवाई, चर्चेने प्रश्न सोडवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:50 AM