लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी परदेशातून धान्य आयात करण्यापेक्षा स्वत: व भाजप सरकारने शेती करावी यासाठी कुणबी सेनेने बुधवारी शेतीचे साहित्य तहसीलदारांमार्फत भाजप सरकारला दिले. यामध्ये बैलजोडी, नांगर, ब-या, हातोल, धान्य व घोंगडी आदींचा समावेश होता. हे साहित्य देऊन सरकारला शेती करण्याचे आव्हान देऊन निषेध नोंदविला तसेच शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व कुणबी सेनाप्रमुख व काँग्रेसचे नेते विश्वनाथ पाटील यांनी केले. यावेळी खंडेश्वरी नाका येथून जनजागरण फेरी काढण्यात आली. तिचे तहसीलदार कार्यालयाजवळ मोर्चात रूपांतर झाले. ‘शेतकरी विरोधी सरकार हायऽ हायऽऽ’, ‘जय जवान; जय किसान’, ‘गोलियोसे मर रहे है जवान; गोलियोसे मर रहे है किसान’, ‘किसान हितकी बात करेगा; वही देश पे राज करेगा ’ अशा घोषणांनी वाडा परिसर दणाणून गेला होता. शेती परवडत नसल्याने शेतीवर आधारित सर्व समाजघटक व कष्टकरी वर्ग हवालिदल झाला आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी उध्वस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मागे बॅकांचा ससेमिरा लावला आहे. त्यातच बडोदा-पनवेल मार्ग, मुंबई-नागपूर मार्ग यांची गरज नसतांनाही असे महाकाय रस्त्याचे प्रकल्प व शेती विरहित स्मार्ट सिटी, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, रिलायन्स गेल इंडिया कंपनीच्या गॅस वाहिन्या यासाठी शेतकऱ्याला विश्वासात न घेता पोलीस व निमलष्करी दलाच्या बळावर शेतकऱ्याच्या जमिनी भांडवलदार व सरकारकडून हडप केल्या जात आहेत असे, आरोप त्यांनी सरकारवर केले.शेतकऱ्याला आपल्या वारसाला जमिन नावावर करून देता येऊ नये म्हणून शासनाने जिझिया कराला लाजवेल अशी स्टॅम्प डयÞुटी आकारून शेतकऱ्याला शेती पासून बेदखल करण्याचा घाट घातला आहे. यातच ३५ सेक्शन, इको सेन्सेटीव्ह झोन वनसंज्ञा आदी शेतकरी विरोधी कायदे करून रेती वीट उद्योग धोक्यात आणल्याची टीका केली. शिवारात येऊन काम कराभाजपच्या मंत्र्यानी शिवाराला भेट न देता शिवारात येऊन काम करावे म्हणजे शेतकऱ्याचे दु:ख काय आहे ते त्यांना कळेल अशी टीका कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांनी मोर्चा दरम्यान केली. यावेळी तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी निवेदन व शेतीचे साहित्य स्वीकारून ते सरकारला पाठविणार असल्याचे सांगितले. येत्या पंधरा दिवसांत सरसकट कर्जमाफी न केल्यास संपूर्ण कोकणातील नाक्या नाक्यांवर चक्का जाम आंदोलन करून रस्ता जाम करण्यात येईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
कुणबी सेनेकडून सरकारला शेती करण्याचे आवाहन
By admin | Published: June 08, 2017 3:22 AM