मुंबई : आंध्र प्रदेशची सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चंद्रभान सानप याच्या अपिलावरील सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने मार्चमध्ये अपिलावरील सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले आहे. चंद्रभान सानप याने दाखल केलेल्या अपिलावरील सुनावणी मार्चमध्ये उच्च न्यायालयाने ठेवली आहे. सरकारी वकील युक्तिवादास सुरुवात करतील. गेल्या वर्षी ३० आॅक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने सानप याला २३ वर्षीय ईस्थरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरुद्ध सानपने उच्च न्यायालयात अपील केले. तर राज्य सरकारने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला.नाताळची सुट्टी साजरी करून ईस्थर आंध्र प्रदेशहून ५ जानेवारी रोजी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनसला उतरली. आजूबाजूला रिक्षा-टॅक्सी उपलब्ध नसल्याने ईस्थर काही वेळ स्टेशनवरच बसली, ती एकटी आहे, हे हेरून सानप याने ईस्थरला अंधेरीला सोडण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह भांडुप येथील झुडपांत लपविण्याचा प्रयत्न केला.ईस्थरविषयी काहीच न कळल्याने तिच्या काकांनी ती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर १६ जानेवारी रोजी तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. १६ मार्च रोजी पोलिसांना सानपला पकडण्यात यश आले. (प्रतिनिधी)
अपिलावरील सुनावणी लवकरच
By admin | Published: February 28, 2017 4:57 AM