ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 12 - सतत खोळंबणा-या लोकल सेवेमुळे संतापलेल्या मध्य रेल्वे प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको केल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तब्बल साडे चार तासापासून लोकल सेवा ठप्प झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी फोनवरुन बातचीत करण्यात आली असून, यासंदर्भात आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
सकाळी भिवपुरी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाला होता. ज्यामुळे सकाळी 5 वाजून 5 मिनिटांची लोकल उशिरा आली. यामुळे बदलापूरमधील संतप्त प्रवाशांनी स्टेशनवरच लोकल रोखली, आणि स्टेशन मास्तरच्या कार्यालयाला घेराव घातला. गाडी वेळेवर येईल असं लिहून देण्याची मागणी प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे केली होती.
GM DRM,officers directed early morning to help passengers in #Badlapur,sort out their problems.Requesting all not to agitate,all steps taken— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 12, 2016
संतप्त प्रवाशांनी कर्जतच्या दिशेने जाणारी लोकलही रोखली असल्याने दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झाला . सीएसटीच्या दिशेना जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडलं . याशिवाय कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही खोळंबा झाला आहे.
दरम्यान कल्याण – डोंबिवली परिवहनकडून कल्याण बदलापूर विशेष बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे, त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आंदोलन मागे घेण्याचं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.
- रखडलेल्या एक्स्प्रेस गाड्या
17412 महालक्ष्मी एक्स्प्रेस
12116 सिद्धेश्वर एक्स्प्रेस
22105 इंद्रायणी एक्स्प्रेस
12127 इंटरसिटी एक्स्प्रेस
18520 विशाखापट्टणम् एक्स्प्रेस
11007 डेक्कन एक्स्प्रेस
11301 बंगळुरु एक्स्प्रेस