मुंबई : नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर बुधवारपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने केवळ दोन मुख्य याचिकांवर आॅक्टोबरमध्ये अंतरिम आदेश दिला. सर्व याचिकांवर सुनावणी घेतलीच नाही, ही बाब तुम्ही सर्वोच्च न्यायालयापासून लपवली, अशा शब्दांत मंगळवारी न्या. अभय ओक यांनी नाशिक-नगरच्या याचिकाकर्त्यांना फैलावर घेतले.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीमएसी पाणी सोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात दिली. त्या विरोधात नाशिक व नगरच्या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. मात्र, या याचिकांवरील अंतिम सुनावणी १८ नोव्हेंबरपासून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले. मंगळवारी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला काही बाबी न सांगितल्याने, न्या. ओक यांनी याचिकाकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात अनेक याचिका सादर करण्यात आल्या आहेत. त्यातील बऱ्याच याचिका अद्याप दाखल करून घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अंतिम सुनावणी कशी घ्यायची, असेही न्यायालयाने सुनावले.खंडपीठाने पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी ठेवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खंडपीठाला या याचिकांवरील अंतिम सुनावणी बुधवारपासून घ्यावी लागणार आहे. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने १९ सप्टेंबरला जायकवाडीमध्ये नाशिक-नगरच्या धरणांतून १२.८४ टीमएसी पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अर्जदारांना कोर्टाने घेतले फैलावर!
By admin | Published: November 18, 2015 2:44 AM