मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीने वेगळे वळण घेतले आहे. साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध व समर्थन करणारे मध्यस्थी अर्ज विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने तिच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या अर्जाला परवानगी दिली असली, तरी तिच्या जामीन अर्जाचे समर्थन करणाऱ्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वीसह अन्य तिघांविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळले, तसेच सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला. मात्र, तिच्या जामीन अर्जाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज बॉम्बस्फोटातील एका पीडिताने दाखल केला, तर तिची जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी दीपक पारेख यांनीही मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. निसार बिलाल यांनी एनआयएने दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर, दहशतवाद प्रतिबंधक पथकाला (एटीएस) प्रतिवादी करावे, अशी मागणी बिलाल यांनी मध्यस्थी अर्जात केली आहे. शुक्रवारच्या सुनावणीत विशेष न्यायालयाने बिलाल यांना मध्यस्थी करण्याची परवानगी दिली. मात्र, एटीएसला प्रतिवादी करण्याच्या मागणी फेटाळली.देवांग पारीख नावाच्या व्यक्तीनेही साध्वी प्रज्ञासिंगच्या जामीन अर्जात मध्यस्थी अर्ज केली आहे. पारीख यांनी आपण साधक असल्याचे अर्जात म्हटले आहे. ‘मालेगाव २००६ च्या आरोपींना एनआयने क्लीनचिट दिल्यानंतर, त्यांना जामीन मिळाला. त्यांच्या जामीन अर्जाला कोणीही विरोध केला नाही, परंतु साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात येत आहे. तिचे नाव आरोपपत्रातून वगळूनही तिला कारागृहात ठेवण्यात आले आहे. सरकार तिच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत आहे,’ असा युक्तिवाद पारीख यांच्या वतीने अॅड. सुभाष झा यांनी विशेष न्यायालयापुढे केला. (प्रतिनिधी)- विशेष न्यायालयाने पारीख यांच्या अर्जावर सरकारला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात ३७ जण मृत्युमुखी पडले होते.
साध्वी प्रज्ञासिंगच्या जामिनाविरुद्ध अर्ज
By admin | Published: June 19, 2016 3:00 AM