पुणे : बालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस इमारतीच्या १४ मजल्यावरील स्लॅब दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या ४ बांधकाम व्यावसायिकांनी आपल्याविरुद्ध काढण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे, यासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला आहे़ या अर्जाची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे़ बांधकाम व्यावसायिक अरविंद प्रेमचंद जैन (वय ४४, रा. प्राइड पॅराडाईज, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), श्रवण देवकीनंदन अगरवाल (वय ४५, रा़़ पाषाण), श्यामकांत जगन्नाथ वाणी शेंडे (वय ५२, रा़ सणस मेमरीज, शिवाजीनगर) आणि कैलास बाबूलाल वाणी (वय ४८, रा़ गोपाळ पार्क, एरंडवणे) या चौघांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे.प्रदीप जनार्धन कोसुंबकर (वय ४१, रा़ गणेशनगर, कोथरूड), हंसल सुधीर पारेख (वय ४७, रा़ हर्ष विहार सोसायटी, नवीन डीपी रस्ता, औंध) यांच्या विरुद्ध न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट बजावले आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, आरोपी सापडले नाहीत. यासाठी त्यांचे मोबाईल रेकॉर्डही तपासण्यात आले तरीही ते मिळून आले नाही. त्यांना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यासाठी अजामीनपत्र वॉरंट बजावणे गरजेचे असल्याने, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सहाही जणांविरुद्ध सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांच्यामार्फत अर्ज केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.६ बांधकाम व्यावसायिकांचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यानंतर ते फरार झाले आहेत़ आम्ही फरार नाही, आम्ही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावरील निर्णय प्रलंबित असल्याने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात यावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. आरोपी न्यायालयीन कोठडीतबालेवाडी येथील पार्क एक्स्प्रेस जॉइन्ट व्हेंचर या बांधकाम प्रकल्पातील इमारतीचा चौदावा मजला २९ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोसळून ९ मजुरांचा मृत्यू झाला होता, तर तिघेजण जखमी झाले होते. या प्रकरणी मृगांक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने १४ व्या मजल्याच्या स्लॅबच्या सेंटरिंगचे काम सुरू होते. या प्रकरणी यापूर्वी भावेन हर्षद शहा (वय ३४, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (विवेकनगर, आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. कीर्तीनगर, सांगवी), श्रीकांत किसन पवार (वय ४४, रा़ कात्रज) व महेंद्र सदानंद कामत (वय ४१, रा. विज्ञाननगर, बावधन) यांना अटक करण्यात आली होती, हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज
By admin | Published: September 19, 2016 12:50 AM