पुणे : लक्षावधी लोक एकत्र जमतात, नि:शब्दपणे आपल्या मागण्या मांडतात, तितक्याच शांतपणे ते परत घरी जातात़ कोणताही कायदा सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होत नाही़ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चांमुळे मराठा एकीचे विराट दर्शन घडत असून त्याची गिनेज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी अर्ज करण्यात आला आहे़ त्यांचा हा अर्ज स्वीकारण्यात आला आहे़ कोपर्डी घटनेनंतर मराठा समाज एकवटला आहे़ औरंगाबाद येथील पहिल्या मूक मोर्चाला लक्षावधी लोक जमले़ त्यानंतर उस्मानाबाद, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर, सोलापूर, नवी मुंबई येथील मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संतोष शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये निघालेल्या मूकमोर्चात ५, १०, १५ लाख समाज बांधव सहभागी झाले होते. हे मोर्चे अतिशय शांततेत आणि सुनियोजित पद्धतीने झाले आहेत़ राज्यातील उर्वरित २१ जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे होणार असून जवळपास १ कोटी २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे़ मुख्य म्हणजे मोर्चात सहभागी झालेले तरुण स्वच्छता करण्यातही सहभागी होत आहेत. मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने होते़ एकाचवेळी लाखो लोकांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणण्याचाही हा एक विक्रम असणार आहे़ त्यामुळेच गिनेज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. (प्रतिनिधी)
‘गिनिज’ रेकॉर्डसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे अर्ज
By admin | Published: September 23, 2016 6:26 AM