मनीषा म्हात्रे,
मुंबई- मुलुंड शिवसेना-भाजपा राडाप्रकरणानंतर भाजपा कार्यकर्ते धास्तावल्याचे काहीसे चित्र पूर्व उपनगरात निर्माण झाले आहे. सोमय्यांपाठोपाठ सुधार समिती अध्यक्ष आणि भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनीदेखील मुंबई पोलीस आयुक्तांकडे जिवास धोका असल्याची भीती वर्तवली आहे.पालिकेच्या रावण दहनावरून पेटलेल्या सेना-भाजपा राड्यानंतर पूर्व उपनगरातील चित्र पालटले आहे. दसऱ्याच्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांवर हल्ला चढविला. त्यानंतर, झालेल्या राड्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले. सोमय्या यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अशात पोलिसांनी दबावापोटी पक्षपाती भूमिका घेत, फक्त सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरुवातीला पाच जणांना अटक केली. तेव्हा पोलिसांनी जामीनपात्र कलमांतर्गत ही कारवाई केली होती. त्यानंतर, सोमय्या यांच्यासह भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची भेट घेतली. त्यांच्या आदेशाने या कलमात ३२४ बरोबरच भादंवि ३२६ या कलमाची भर पडली. रातोरात सेनेच्या आणखीन ९ नेत्यांना गोड बोलून पोलिसांनी जाळ्यात ओढले. ३२६ कलमाची वाढ झाल्याने, मुलुंड न्यायालयाने अटक शिवसैनिकांचा जामीन फेटाळला. या वेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे भाजपाचा एकही कार्यकर्ता येथे फिरकलादेखील नाही. येथून त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. यामध्ये सेनेच्या उपविभाग अध्यक्षांसह शाखाप्रमुखांचा समावेश आहे. अद्याप त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. सेनेचे पदाधिकारी क्रॉस केससाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिवसेना कार्यकर्ते संतापले आहेत. अटक झालेले शिवसेनेचे पदाधिकारी बाहेर आल्यानंतर काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय अद्याप सेनेचे बडे नेते समोर आले नाहीत. त्यामुळे शांत राहून ते काहीतरी विचार करत असल्याची भीतीही भाजपा नेत्यांना सतावत आहे. सोमय्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानंतर त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली. सोमवारी सुधारसमिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनीदेखील पोलीस आयुक्तांना जिवास धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे. गेले दोन दिवस धमकीचे फोन येत आहेत. शिवाय काही मंडळी कार्यालयाबाहेर संशयास्पद फिरत असून मला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. >निवडणुकांसाठी गल्लोगल्ली फिरावे लागतेगंगाधरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्त्यांसह गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. या प्रकरणानंतर कोणीही आपल्यावर हल्ला चढवू शकते, अशी भीती आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुलुंड सहायक पोलीस आयुक्तांना कळविले. त्यानंतर, आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी त्यांची भेट शक्य झाली नाही. त्यामुळे बुधवारी त्यांना लेखी पत्र देण्यात येणार आहे.