CM Ladki Bahin Yojana ( Marathi News ) : यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असून यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे. मात्र या योजनेतील अटींबाबत वारंवार संभ्रम निर्माण होत आहे. अशातच मराठीतून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र हे अर्ज बाद होणार नसल्याचं स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, "अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतू ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत."
दरम्यान, "मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये. मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नाही," असं आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.