ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 7 - शहरातील धोकादायक नागरिकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शिवसेनेने गेल्या 15 वर्षांपासून दिलेल्या चिवट लढ्याअंती राज्य शासनाने गुरुवारी अंतिम अधिसूचना काढल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर प्रदेशासाठी ही योजना लागू करण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पापांचे बळी जात असल्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास व्हावा आणि या इमारतींत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शिवसेना गेली 15 वर्षे चिवटपणे लढा देत होती. शिवसेनेचे तत्कालीन आमदार, जिल्हाप्रमुख आणि विद्यमान ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना ठाण्यासाठी लागू व्हावी, यासाठी मोठा लढा उभारला होता. शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींसह अन्य पक्षीयांनीही वेळोवेळी या लढ्याला साथ दिली. अखेरीस योजनेतील सर्व अडथळे दूर होऊन गुरुवारी राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे या सुधारित योजनेनुसार धोकादायक इमारतीत राहाणाऱ्या रहिवाशांना 300 चौरस फुटांपर्यंत विनामूल्य घर मालकी हक्काने मिळणार आहे.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असून कल्याण-डोंबिवलीसह एमएमआर प्रदेशातही ही योजना लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे. एकट्या कल्याण-डोंबिवलीतच एक लाखाच्या आसपास रहिवासी धोकादायक इमारतीत राहात आहेत, याकडे खा. डॉ. शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा(मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री)(आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री)
एमएमआर प्रदेशात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून वीजयंत्रणा आणि पाणीपुरवठा यंत्रणांच्या अद्ययावतीकरणाची कामेही प्रगतीपथावर आहेत. मेट्रो आणि जलवाहतुकीच्या रुपाने एमएमआर प्रदेशाला वाहतुकीचा सक्षम पर्यायही उपलब्ध होणार असल्यामुळे क्लस्टर योजनेचा भार या परिसरावर येणार नाही. त्यामुळे एमएमआर प्रदेशातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनाही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून तातडीने दिलासा देण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.