पुणे : ‘‘कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ६० वयोमर्यादेतील घरकामगारांचा समावेश सरकारच्या राष्ट्रीय धोरणामध्ये केला आहे. परंतु, या धोरणामध्ये कोणत्याही वयोगटाच्या मर्यादा न ठेवता सर्व वयोगटातील महिलांचा समावेश घरेलू कामगार राष्ट्रीय धोरणामध्ये केला जावा. महाराष्ट्रात महिला घरेलू कामगारांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यांना वेळेवर पेन्शन मिळण्यासाठी घरेलू कामगारांना माथाडी कामगारसारखा कायदा लागू करणे गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी व्यक्त केले.एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आणि अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीतर्फे घरेलू कामगारांसाठीच्या राष्ट्रीय धोरणावर चर्चासत्र झाले. प्रा. सुभाष वारे, डॉ. रूपा कुलकर्णी, रामेंद्रकुमार, डॉ. किरण मोघे, मेधा थत्ते यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला.मोघे म्हणाल्या, ‘‘जे राष्ट्रीय धोरण सरकारने घरेलू कामगारांसंदर्भात मांडले आहे, त्याचा ऊहापोह करणे गरजेचे आहे. कामाचे नियमन व्हावे, सामाजिक सुरक्षितता मिळावी; त्यामुळे त्यांना किमान वेतन व कमाल वेतन मिळाले पाहिजे, अशी आपली मागणी आहे.’’थत्ते म्हणाल्या, ‘‘कामगार कायद्याचे संरक्षण घरेलू कामगारांना दिले पाहिजे. तसेच माथाडी कामगार कायदे घरेलू कामगारांना लागू झाले पाहिजेत. घरेलू कामगारांसाठी जे राष्ट्रीय धोरण बनविले गेले आहे, त्या पॉलिसीचे अॅनॅलिसीस करणे गरजेचे आहे.’’ (प्रतिनिधी)
माथाडी कामगार कायदा घरेलू कामगारांना लागू करा
By admin | Published: May 30, 2016 1:47 AM