मुंबई : परळ येथील हाफकिन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरच्या बाल व महिला कॅन्सर रुग्णालय आणि रेडीओ थेरपी सेंटरसाठी देण्यात आली आहे. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प सुरू करण्यासाठीची आणखी पाच वर्षे मुदत वाढविण्यात देण्यात येईल. तसेच सेंटर उभारणीसाठीची कामे तातडीने सुरू व्हावीत यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.प्रश्नोत्तराच्या तासात परळ मुंबई येथील हाफकिन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरला दिल्याबाबत सदस्य दत्तात्रय भरणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जगात अशा पद्धतीची आरोग्य सेवा देणाºया फक्त ३४ संस्था आहेत. यासाठी केंद्र शासन ५०० कोटी रुपये देणार आहे. पण राज्य शासन यात दप्तर दिरंगाई करत आहे, असे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कामासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी मागणी केली. तर केवळ अधिकारी नेमून काही होणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करा, अशी मागणी माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. शेवटी चंद्रकांत पाटील यांनी या कामासाठी स्वतंत्र अधिकारी देण्याची घोषणा केली. यावेळी उपप्रश्नांना उत्तर देताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने ही जागा टाटा सेंटरला दिली असून, लवकरच हे सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासकीय / निमशासकीय सेवेतील कर्करोग पीडित कर्मचाºयांना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात उपचारासाठी ५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.टाटा मेमोरियल सेंटरला देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या हाफकिन संस्थेच्या जागेमध्ये संस्थेतील अधिकाºयांची निवासस्थाने, विद्यार्थ्यांच्या खोल्या, अतिथीगृहे व वर्ग ४ च्या कर्मचाºयांसाठी निवासस्थाने येत असल्याने पर्यायी इमारती बांधण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर ५ कोटी रुपये देणार असल्याची माहितीही राठोड यांनी विधानसभेत दिली. या वेळी सदस्य पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे पाटील, मंगल प्रभात लोढा, अजय चौधरी, राज पुरोहित यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.
कॅन्सर रुग्णालयासाठी विशेष अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 2:43 AM