अहमदनगर : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाबाबत येथील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारपासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली़ खटल्यातील दोन आरोपींच्या विनंतीनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी वकील अॅड़ योव्हान मकासरे यांची नियुक्ती झाली आहे. मकासरे हे आरोपी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्यातर्फे खटला लढविणार आहेत़ आरोपींसाठी सरकारी वकिलाची नियुक्ती झाल्याने बुधवारी या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे़ कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे़ आरोपींकडे वकील नसल्याने पहिल्या दिवशी दोषारोप निश्चितीची प्रक्रिया झाली नाही़ कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे (तिघे, रा़ कोपर्डी) यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे़ अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयासमोर या खटल्याचे कामकाज सुरू झाले़ मुख्य आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते़ शिंदे व भवाळ यांनी वकील न दिल्याने त्यांना न्यायालयाकडून विचारणा झाली असता त्यांनी आम्हाला सरकारी वकील द्यावा, अशी विनंती केली़ तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या बाजूने अॅड़ प्रकाश आहेर हे खटला चालविणार आहेत़ भैलुमे याच्या वतीने न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून, त्याने मुक्त करण्याची मागणी केली आहे़ सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी सुनावणी सुरू झाल्यानंतर निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती केली़ न्यायालयाने हा युक्तीवाद मान्य केला़ तीनही आरोपींना सुनावणी सुरू असेपर्यंत नगर येथील सबजेलमध्ये ठेवण्यात यावे, अशी विनंती निकम यांनी न्यायालयाकडे केली.(प्रतिनिधी)>खासगी वकीलपत्र नाकारलेकोपर्डी घटनेतील दोषारोपपत्रात नाव असलेल्या तिघा आरोपींचे वकीलपत्र घेण्यास एक वकील तयार होते़ न्यायालयाकडे त्यांनी तसा अर्जही दिला होता़ मात्र, एका आरोपीने स्वत:चा वकील आधीच निश्चित केला होता़, तर दुसऱ्या दोघांना सरकारी वकील हवा असल्याने हे वकीलपत्र नाकारण्यात आले़निकम यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, मंगळवारी कोपर्डी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली़ त्यांच्यासमवेत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे उपस्थित होते़ निकम यांनी पोलिसांकडून पुन्हा एकदा सर्व माहिती घेतली़
कोपर्डीच्या आरोपींंसाठी सरकारी वकिलाची नियुक्ती
By admin | Published: October 19, 2016 5:37 AM