यदु जोशी, नागपूर३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आज आयएएस अधिकारी पीयूष सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला. महामंडळात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्याला बसविण्यात आले आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. महामंडळातील घोटाळा लोकमतने उघडकीस आणला होता. व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले पीयूष सिंग हे सध्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त आहेत. १ जानेवारी २०१५ पासून यशवंत मोरे (उपसंचालक; सामाजिक न्याय) यांच्याकडे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार होता. महामंडळातील घोटाळेबाजांविरुद्ध त्यांनी कठोर कारवाई केली.कोहलीला अखेर अटकसाठे महामंडळातील घोटाळ्यांप्रकरणी औरंगाबादचा अमरदीपसिंह कोहली याला आज सीआयडीने अटक केली. साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याकरता औरंगाबाद येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. तेव्हा रमेश कदम हा महामंडळाचा अध्यक्ष होता. महामंडळाचे १२ कोटी रुपये अर्धा एकर जमिनीच्या खरेदीसाठी कोहलीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. जमिनीचा हा भाव बघून तपास यंत्रणा चक्रावली होती. तसेच, त्याच्या सतनाम आॅटोमोबाइल या फर्मला ८ कोटी रुपये महामंडळाकडून देण्यात आले, अशी माहिती आहे. हा पैसा कशासाठी देण्यात आला, हे गौडबंगाल आहे.
साठे महामंडळावर अखेर आयएएसची नियुक्ती
By admin | Published: December 10, 2015 3:12 AM