परभणी- कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक कोठडीत आहेत. त्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचे भाजपकडून आरोप होत आहेत. या आरोपादरम्यान त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. पण, राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्याकडील पालकमंत्रिपद काढून घेतले आहे.
नवाब मलिक परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होते, पण आता जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मुंडे यांच्याकडे सध्या बीडचे पालकमंत्रिपद असून, आता त्यांच्यावर परभणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून, यात गोंदियाच्या पालकमंत्रिपदी प्राजक्त तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.