मुंबई : पुणे महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने तृतीयपंथींची कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये अशा नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांना केली जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
तृतीयपंथींच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी उपप्रश्न विचारला होता. तृतीयपंथी समाजासाठी पाच वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महामंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती रखडल्या असून, त्या दोन महिन्यांत केल्या जातील, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
विभागीय आणि जिल्हा स्तरावरही यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यावरील नियुक्त्याही याच दोन महिन्यांत करण्यात येतील. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात आल्यावर तृतीयपंथींयांना बीजभांडवल उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.