पुणे : शिक्षण मंडळामध्ये १९९९पासून अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या वारसांची भरती प्रक्रिया रखडली होती. अखेर ही भरती प्रक्रिया सुरू करून अनुकंपाखालील ४९ वारसांना शिक्षण मंडळात सामावून घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या वारसांना अखेर न्याय मिळाला आहे.शिक्षण मंडळामध्ये ११९९ पासून अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. नोकरीत सामावून घ्यावे, याकरिता त्यांच्या वारसांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्याला यश आले नव्हते. अखेर त्यांनी याविरोधात महापालिकेसमोर उपोषण सुरू केले होते. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास लावले होते. या संदर्भात झालेल्या बैठकीला वासंती काकडे, आयुक्त कुणाल कुमार, उपायुक्त मंगेश जोशी, मुख्य लेखापाल उल्का कळसकर, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरद्दिन सोमजी, सदस्य बाळासाहेब जानराव, प्रदीप धुमाळ, रघुनाथ गौडा, लक्ष्मीकांत खाबिया, रवींद्र चौधरी, मंजुश्री खर्डेकर, विनिता ताटके, अमित मुरकुटे, प्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण उपस्थित होत्या. शालेय पोषण आहाराच्या अनुदानासाठी साडेचार कोटी रुपयांची रक्कम वाढवून मिळण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीसमोर सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. शिक्षण मंडळातील ५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे, कोठी कार्यालयामध्ये नवीन ५ कर्मचारी हवे आहेत. अशा एकूण १५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे आयुक्तांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. पालिकेतील कर्मचारी शिक्षण मंडळात वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना १५ जून २०१६ पूर्वी गणवेश, बूट, दप्तर आदी साहित्य पुरविण्याचा प्रयत्न शिक्षण मंडळाकडून करण्यात येत आहे.
४९ वारसांना सेवेमध्ये घेण्यास अखेर मान्यता
By admin | Published: June 10, 2016 12:54 AM